समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

नागपूर विभाग:

नागपूर विभागात एकूण ६ जिल्हे आणि ६४ तालुके आहेत. या विभागात ७ लोकसभा एकूण मतदार संघ असून, त्यातील १ मतदार संघ अनुसूचित जाती राखीव आहे. विधानसभेचे ३३ एकूण मतदार संघ असून, त्यापैकी ५ अनुसूचित जाती राखीव मतदार संघ आहेत.

या विभागात २ महानगरपालिका, ४२ नगरपरिषद, आणि २८ नगर पंचायती आहेत. तसेच १ कटकमंडळ, ६३ पंचायत समिती, आणि ३६७१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. नागपूर विभागात एकूण २८ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत.

 

नागपूर विभागातील जिल्ह्यांची ऐतिहासिक पार्श्वभुमी

नागपूर शहराची स्थापना राजे बख्त बुलंदशहा यांनी केली होती, व त्यानंतर या भागावर भोसल्यांचे राज्य होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन एक ऐतिहासिक घटना घडवली. सेवाग्राम (वर्धा) येथे महात्मा गांधी यांचा आश्रम आहे, जिथे ते आणि त्यांचे सहकारी वास्तव्यास होते.

भंडारा जिल्ह्यातील पवनी हे शहर बुद्धकालीन स्तूपाच्या अवशेषांमुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. हे शहर प्राचीन काळी बौद्ध धम्माचे एक प्रमुख केंद्र होते. याशिवाय, भंडाऱ्यातच प्रसिद्ध भुईकोट किल्ला व पुरातन गरुड खांब आढळतात.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड हे आदिवासी गोंड समाजाचे कुलदैवताचे स्थान आहे. या प्रदेशावर नवव्या शतकात वैरागडच्या मान राजांकडून गोंड राजांनी सत्ता हस्तगत केली होती. सन १२४० ते १७५१ या काळात गोंड राजांची सत्ता होती. त्यानंतर येथे मराठ्यांची सत्ता स्थापण्यात आली.

या प्रदेशावर फार प्राचीन काळी राष्ट्रकुट राजवट होती. त्यांनीच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडा मंदिर बांधले. त्यानंतर चालुक्य व देवगिरीचे यादव यांचे देखील या भागावर राज्य होते.

 

विभागाचे भौगोलिक महत्त्व

नागपूर विभागातील नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून, या विभागाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागपूर विभाग महाराष्ट्राच्या पूर्व भागात स्थित आहे आणि त्याच्या सीमेला छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांची सरहद्द लागून आहे. नागपूर शहर हे देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले असल्यामुळे वाहतूक, संपर्क आणि व्यापाराच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

या विभागातील भंडारा आणि गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. याच विभागातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये घनदाट जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगा ही या विभागातील एक प्रमुख नदी असून, या भागातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा स्रोत आहे. नागपूर विभाग उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात येतो आणि त्यामुळे येथे पानझडी वृक्षप्रजातींनी व्यापलेली जंगलं आढळतात.

 

शहरीकरण

नागपूर विभागातील नागपूर शहर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये सामाविष्ट असलेल्या देशातील १० स्मार्ट शहरांपैकी एक आहे. नागपूर विभागात २ महानगरपालिका, ४२ नगरपरिषदा आणि २८ नगर पंचायती आहेत, ज्यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे.

या विभागातील नागपूर, हिंगणा, कामठी, वर्धा, देवळी, भंडारा-लाखनी, गोंदिया, आमगाव, चंद्रपूर, बल्लारपूर, गडचिरोली आणि नवेगाव या जिल्हा किंवा तालुक्यांमध्ये १००% शहरीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे नागपूर विभाग हा विदर्भातील एक महत्त्वाचा शहरी आणि प्रशासकीय केंद्र मानला जातो.

 

विभागातील लोकसंख्या

एकुण लोकसंख्या = १,१७,५४,४३४
ग्रामीण लोकसंख्या = ६७,९९,२०३
शहरी लोकसंख्या = ४९,५५,२३१

 

नागपूर विभागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या

विभागातील एकुण लोकसंख्या = १,१७,५४,४३४
अनुसूचित जातीची लोकसंख्या = १८,०९,६३१
प्रमाण (%) = १५.४०

 

साक्षरतेचे प्रमाण:

नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४६,५३,५७० असून, स्त्रियांचे साक्षरतेचे टक्केवारी ८४.५१% आणि पुरुषांचे ९२.०९% आहे. वर्धा जिल्ह्यातील लोकसंख्या १३,००,७७४ असून, स्त्री साक्षरता ८१.८१% आणि पुरुष साक्षरता ९१.९२% आहे. भंडारा जिल्ह्यात १२,००,३३४ लोकसंख्या असून, तेथे स्त्री साक्षरता ७७.०८% आणि पुरुष साक्षरता ९०.३५% आहे. गोंदिया जिल्ह्यात १३,२२,५०७ लोकसंख्या असून, स्त्री साक्षरता ७७.९०% आणि पुरुष साक्षरता ९२.१०% आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसंख्या २२,०४,३०७ असून, स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण ७३.००% आणि पुरुषांचे ८६.८०% आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या १०,७२,९४२ असून, स्त्री साक्षरता ६६.३०% आणि पुरुष साक्षरता ८२.३०% आहे.

एकूण १,१७,५४,४३४ लोकसंख्येमधून सरासरी स्त्री साक्षरता ७६.७७% तर पुरुष साक्षरता ८९.२६% आहे.

 

नागपूर विभागातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर:

नागपूर जिल्ह्यात प्रति १००० पुरुषांमागे ९५१ महिलांचा लिंग गुणोत्तर आहे. वर्धा जिल्ह्यात हे प्रमाण १०००:९५५ आहे. भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर १०००:९८२ आहे. गोंदिया जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असून, ते १०००:९९९ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रति १००० पुरुषांमागे ९६१ महिला आहेत.

सर्व जिल्ह्यांचा विचार करता, नागपूर विभागातील सरासरी लिंग गुणोत्तर १०००:९७१ इतके आहे.